अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

केंद्रिय गृह मंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून, अमित शाह यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं आहे. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या या मागणीवर विरोधकांनी टिका केली होती. हा वाद चांगलाच चिघळला होता. अशातच आता अमित शाह यांनी बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करत विरोधकांना उत्तर दिलं आहे.

याप्रसंगी बोलताना अमित शाह यांनी “बाजीरावांचे पुतळे देशभरात आहेत. माझ्या गावात आहे. पण स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच आहे” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच, “श्रीमंत बाजीरावांच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. मला वाटतं अनेक वर्ष भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही” असं अमित शाह म्हणाले. थोरले बाजीराव पेशवे यांनी 20 वर्षात 41 युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले देखील. अशा वीर योद्धाचा पुतळा आज एनडीएत उभारला गेलाय याचा अभिमान वाटतो, असं अमित शहांनी म्हटलं आहे.

“मी पुण्याच्या भूमीत उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो. पुण्याची भूमी एक प्रकारे स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान आहे. 17 व्या शतकात या ठिकाणाहून स्वराज्याचा आलेख, तंजावूरपासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. थोरले बाजीराव पेशवे यांचा, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या अनावरणाप्रसंगी ते बोलत होते.

Share