रेव्ह पार्टीत पती अटकेत; रोहिणी खडसेंनी सोडलं मौन; म्हणाल्या ‘कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर…’

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली. पुण्यातील एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी काल २७ जुलै रोजी धाड टाकली. यात प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी चार पुरुष आणि दोन महिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरणी सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून त्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता याच प्रकरणी रोहिणी खडसेंनी मौन सोडलं आहे.

रोहिणी खडसे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पतीसोबतचा फोटो शेअर करत ”कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

पुण्याच्या खराडी भागातील एका उच्चभ्रू वसाहतीत आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीत प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. पोलीसांना या रेव्ह पार्टीची माहिती मिळ्याल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. या पार्टीत पोलिसांना अंमली पदार्थांसह दारू, गांजा आणि हुक्का मोठ्या प्रमाणात सापडला. पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणात प्रांजल यांच्यासह आणखी चार पुरुष आणि दोन महिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. खेवलकर हे खडसेंचे जावई असल्याने आता सगळीकडे याची मोठी चर्चा होत आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी माध्यमांशी बोलताना, “गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरु आहे, ते वातावरण पाहता असं काहीतरी घडू शकतं, असा अंदाज थोडा थोडा मला येत होता. कारण, काहीजणं अत्यंत अडचणीमध्ये आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये येणार आहेत. मी त्यावर फारसं बोलणार नाही, परंतु जी काही घटना पुण्यामध्ये घडल्याचं सांगितलं जातंय, ते मी माध्यमांमधूनच पाहिलं. माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलेलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Share