मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या ‘भगव्याचा विजय झाला….’

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ साली बॉम्बस्फोट प्रकरणी आज १७ वर्षांनी न्यायालयानं निकाल सुनावला आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. फक्त संशयाच्या आधारावर कोणाला दोषी ठरवू शकत नाही असा निकाल न्यायालयानं दिला आहे. या प्रकरणात आता भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली आहे. मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात या प्रकरणी आज निकाल सुनावण्यात आला.

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ साली भिक्खू चौकात एका दुचाकीत हा स्फोट झाला होता. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळजवळ १०० जण जखमी झाले होते. त्यानंतर या तपासाची सुत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आली होती. एटीएसने यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतर आरोपींना अटक केली होती.

२३ ऑक्टोबर २००८ रोजी बॉम्बस्फोटासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वाहनाचा वापर झाल्यानं त्यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांच्या नावावर असलेली ही दुचाकी रामचंद्र कलासंग्रा याच्या ताब्यात होती. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोटासाठी RDX पुरवल्याचा आरोप होता. जम्मू आणि काश्मीर मधील पोस्टिंग दरम्यान आरडीएक्स मिळवल्याचा आणि त्यानंतर सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी बॉम्ब बनवण्यात आल्याचा एटीएसचा आरोप होता. त्यांनाही अटक झाली. 2010 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.

न्यायालयानं निकाल देताना काय सांगितलं ?
बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं असलं तरी हा ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं. तपासात अनेक त्रुटी होत्या, पंचनामाही योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत, असं निरिक्षण न्यायालयानं नोंदवलं. याशिवाय ती दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची होती हे देखील सिद्ध झालं नाही. आरडीएक्स कर्नल पुरोहितांनी आणलं याचा देखील पुरावा नाही, असंही स्पष्टिकरण न्यायालयानं दिलं आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात यात आहे असा निकाल न्यायालयानं दिला.

प्रज्ञा सिंह ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया

न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी,
‘मला जेव्हा पहिल्यांदा चौकशीला बोलावलं होतं तेव्हा मी माणुसकीच्या नात्याने न्यायचा सन्मान करून मी आले होते. 13 दिवस मला टॉर्चर करण्यात आलं. माझं आयुष उध्वस्त केलं. मी 17 वर्ष अपमानित झाले. मला स्वतःच्याच देशात आतंकवादी बनवलं. ज्यांनी मला हे दिवस आणले त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे. मला ऐकल्याबद्दल मला समजून घेतल्या बद्दल आभार…भगव्याला आंतकवादी म्हटलं. भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला. ज्यांनी हिंदुत्वाला आतंकवादाच नाव दिलं त्यांना कधी माफ केलं जाणार नाही.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Share